आषाढी एकादशी वारी मराठी माहिती 2025
आधुनिक आषाढी वारी २०२५
2025 साली पारंपारिक आषाढी वारीचे स्वरूप तंत्रज्ञानाशी जोडले गेले आहे. यालाच ए आय दिंडी असे म्हटले जाते. केवळ वारकरी संप्रदायातील नव्हे तर भाषा, वय ,ठिकाण, कामाचे स्वरूप या पलीकडे जाऊन सर्वांना वारीमध्ये सहभागी करता यावे हा यामागचा हेतू आहे.
आषाढी एकादशी चे महत्व
आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे. म्हणून आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे शास्त्र आणि वेदानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णू सह एकादशी देवीची मनोभावे उपासना करते त्यांना पापातून मुक्तता व त्यांची उत्तरोत्तर प्रगती होते असा समज आहे.
आषाढी एकादशी आणि पंढरपूर वारी
पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे. आषाढी एकादशीला इथे लाखो भाविक हरिनामाचा गजर करीत पायी चालत येतात हिलाच आषाढी वारी म्हणतात. वारकरी या ठिकाणी पायी चालत येऊन चंद्रभागेत भक्तीभावाने स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रह्म संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वराची, देहुहुन तुकारामांची, त्रंबकेश्वरहुन निवृत्तीनाथांची, पैठणहन एकनाथांची, उत्तर भारतातून कबीरांची पालखी येते. आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादश तिथी. आषाढ महिन्यात दोन एकादशी असतात आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढ वद्य एकादशी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात. हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.
आषाढी एकादशी वारी
वारीला एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. तसेच ही एक सामुदायिक पदयात्रा आहे. ही वारी आषाढ व कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळेस येते. आळंदी व देहू येथून संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या पादुका पालखी त ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत आहेत. वारकरी संप्रदायात नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजे वारी होय. वारकरी संप्रदायात कोणताही भेद नाही
आषाढी एकादशी वारीचा इतिहास
पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा तेराव्या शतकापासून असल्याचा उल्लेख सापडतो. संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्या घराण्यात वारीची परंपरा होती. वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा असली तरी संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो भक्त पुंडलिकच भक्त पुंडलिका पासून या संप्रदायाला सुरुवात होते.
माळकरी/वारकरी
वारी करणाऱ्यास वारकरी म्हणतात. भगवान विष्णूचे अवतार असलेल्या पांडुरंगाचे हे भक्त असतात. आपले कर्तव्य कर्म करीत असताना भगवंत विस्मरण होऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात. ती गळ्यात घातल्याविना वारकरी होता येत नाही असे वारकरी पंथ सांगतो. स्नान करून भाळी गोपीचंदनाचा टिळा लावावा. नित्यनेमाने हरिपाठ म्हणावा. संतांचे ग्रंथ वाचावेत. देवांच्या मूर्तींचे दर्शन घ्यावे. भजन कीर्तनात सहभाग घ्यावा पंढरपूर वारी करावी तसेच एकादशी व्रत करावे सात्विक आहार, सत्वाचरण करावे परोपकार आणि परमार्थही करावा. जीवनातील बंधनातून, मोहातून हळूहळू बाजूस होऊन पांडुरंगाशी एकरूप व्हावे, नामस्मरण करावे असा साधा आणि उघड परमार्थ वारकरी संप्रदायाने सांगितला आहे.
वारकरी महा वाक्य
वारकरी धर्मात कोणत्याही कार्याला सुरुवात करताना पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम! पंढरीनाथ महाराज की जय! तसेच माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय ! जगद्गुरू तुकाराम महाराज की जय! शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय! असे वारकरी महावाक्य बोलली जातात.
वारीचे प्रकार
वारीचे मुख्य दोन प्रकार आहेत.
१).आषाढी वारी – सर्व संतांच्या पालख्या आपापल्या गावातून पंढरपुरात येतात.
२).कार्तिकी वारी- वारकरी आपापल्या गावातून दर्शनासाठी पंढरपूर, आळंदी, देहू येथे जातात.
या जोडीने माघी व चैत्री वारीही होतात.
शासकीय महापूजा
आषाढी एकादशीच्या पहाटे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सपत्नीक श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची पूजा करतात. त्याबरोबरच वारकरी संप्रदायातील एका दांपत्याला प्रतिवर्षी पूजेचा मान मिळतो असा मान मिळणे आदराचे मानले जाते.
रिंगण सोहळा आषाढी एकादशी वारी
रिंगण ही संकल्पना प्रतिवर्षी आषाढीनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या वारीमधील आहे. वारी मार्गावर काही ठराविक गावाच्या माळरानावर रिंगण आयोजित केले जाते. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांचे पालखी सोहळ्यात त्यांचे अश्व सोबत असतात. रिंगण कार्यक्रमात या अश्वांचे महत्व विशेष असते. विविध दिंडी मधून वारकरी आपल्या नियोजित जागी वर्तुळात उभे राहतात. मध्यभागी अश्वाला धावण्यासाठी रस्ता मोकळा सोडला जातो. वारकरी गोलाकार उभे राहून गजर सुरू करतात. हा गजर सुरू असताना अश्व रिंगणाच्या मधून धावतो त्याच्या मागे वारकरी धावतात रिंगण पूर्ण झाले की वारकरी झिम्मा, फुगड्यांचा आनंद घेतात.
रिंगण कोठे होते
संत ज्ञानेश्वर पालखी-चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर,वाखरी पंढरपूर जवळ, माळशिरस, ठाकूर बुवा समाधी, भंडी शेगाव,
संत तुकाराम महाराज- बेलवंडी, इंदापूर, अकलूज, बाजीराव विहीर, वाखरी,
मेंढ्यांचे रिंगण- संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे मेंढ्यांचे रिंगण या सोहळ्यात बकऱ्यांचे रिंगण पिंपळी येथे होते त्यानंतर इंदापूर येथे दुसरे रिंगण होते.
आषाढी एकादशी माहात्म्य कथा
एकेकाळी मृदू मान्य राक्षसाने भगवान शंकरांना प्रसन्न करून एक वर मागून घेतला. तू इतर कोणाकडूनही न मरता केवळ एका स्त्रीच्या हातून मरशील या वरामुळे मृदू मान्य राक्षस खूपच उन्मत झाला. त्याला असे वाटू लागले की कोणती स्त्री आपल्याला मारू शकत नाही. त्यामुळे त्याने देवतावर स्वारी केली. त्यामुळे देवतांनी शंकराकडे मदतीसाठी धावा केला. पण वर दिल्यामुळे भगवान शंकरांना काही करता येत नव्हते. पण त्याचवेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली. तिने या मृदूमान्य राक्षसाला ठार केले. तसेच या दिवशी तुफान पाऊस पडत होता त्यामुळे त्यांना त्या दिवशी स्नान ही घडले व गुहेत लपून राहिल्याने उपवासही घडला. ज्या देवीने मृदू मानण्याचा वध केला त्या देवीचे नाव होते एकादशी त्यामुळे या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात पडला.
परदेशी अभ्यासक आणि पंढरपूर वारी
विविध देशातील परदेशी अभ्यासकांनी महाराष्ट्रातील वारी आणि संत विचाराचा अभ्यास केला आहे.
न्यूयॉर्कमधील वाॅल्डेन उपनगरात एका मंदिरात नाला विल्कीन्सन या अमेरिकन माणसाने तुकाराम महाराजांचे अभंग ऐकले त्यानंतर ते प्रचंड प्रभावीत झाले. त्यानंतर ते तुकोबांच्या अभंगाचा अनुवाद व निरूपणही करू लागले.
देश, प्रांत व भाषेच्या मर्यादा ओलांडून संत तुकाराम महाराजांची गाथा जगभरातील लोकांना कशी भावते याचे हे उदाहरण.
1889 मध्ये मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू अलेक्झांडर ग्रंट यांनी तुकोबांच्या गाथेतील पस्तीस निवडक अभंगांचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले. तसेच 25 हजार रुपयांचे अनुदान जाहीर करून त्यांनी सरकार तर्फे संपूर्ण गाथा प्रकाशित केली.
जर्मन साहित्यिक लोथार लुत्से यांना जर्मन तत्वज्ञ नित्थे आणि संत तुकाराम यांच्या विचारांमध्ये खूप साम्य आढळते. त्यांनी तुकोबांच्या अभंगाचा जर्मन भाषेत भावानुवाद केला.
एल्सा क्रॉस या प्रसिद्ध लेखिकेने सुद्धा तुकारामांच्या अभंगाचा स्पॅनिश भाषेत अनुवाद केला.
अनेक परदेशी अभ्यासकांना कशी पडली वारीची भुरळ
फ्रेंच अभ्यासक असलेल्या डॉक्टर जी. ए. दलरी यांचे मन महायुद्धामुळे घडलेल्या मानवी संहारामुळे उद्विग्न झाले होते. ते शांतता आणि प्रेमाचा संदेश सांगणाऱ्या विचारधारणेच्या शोधात होते. यातूनच ते भारतात हजारो वर्षाच्या आध्यात्मिक परंपरेचा अभ्यास करण्यासाठी ते पुण्यात दाखल झाले. वारकरी संप्रदायातील सोनोपंत मामा दांडेकर यांच्याशी त्यांची ओळख झाली. मराठी संतांचे विचार समजून घेण्यासाठी त्यांनी मामांकडून चार वर्षे मराठी भाषा शिकून घेतली. त्यांना तुकोबांच्या 101 अभंगाचे फ्रेंच भाषेत रूपांतर केले. त्यांच्या या अभंगांचे फ्रान्सच्या रेडिओवर प्रसारण झाले. 1951 मध्ये ते मामांसोबतच पंढरपूरच्या पायी वारीला गेले. 1943 ते 1973 पर्यंत डॉक्टर दलरी भारतात वास्तव्यास होते. या दरम्यान त्यांनी सहा वर्षे वारकरी संप्रदाय श्रीक्षेत्र पंढरपूर विठ्ठल दैवत यांचा अभ्यास करून कल्ट ऑफ विठोबा नावाचा ग्रंथ तयार केला.
दुसरे प्रमुख विदेशी अभ्यासाक म्हणजे जर्मनीच्या हायडलबर्ग येथील डॉक्टर गुंथर सोन्यायमर पायी पंढरीची वारी केलेल्या सोन्यायमर यांनी वारीवर 1989 मध्ये दीड तासांचा वारी अँड इंडियन पिलग्रिमेज नावाचा माहितीपट तयार केला. जर्मन दूरचित्रवाणीने पहिल्यांदा हा माहितीपट प्रसिद्ध केला. यात वारीशी संबंधित अनेकांच्या मुलाखती, आठवणी, मतमतांतरे चित्रित करण्यात आली आहेत.
1855 मध्ये मिचेल मरे हे ख्रिश्चन धर्मोपदेशक महाराष्ट्रत आले होते. त्यांनी आळंदीची यात्रा तसेच मराठी संतावर 10 पुस्तके लिहिली. ज्ञानेश्वर चीफ मराठी पोएट्स असा शोधनिबंध तसेच पंढरपूर विठोबा आणि तुकाराम यांची गोष्ट हे दोन ग्रंथ लिहिले आहेत.
जपानच्या प्राध्यापिका इवानो थिमा यांनी महाराष्ट्राचे दैवते पंढरपूरचा विठ्ठल, विठ्ठलाचे नित्योपचार, महाराष्ट्र आणि विठ्ठल संप्रदाय असे जपानी भाषेत लेख लिहिले.
हे पण वाचा
१).कृत्रिम बुद्धिमत्ता मराठी माहिती २०२५
२).गुरुचरित्र ग्रंथ मराठी माहिती २०२५
३).शेअर मार्केट मराठी माहिती 2025
Also visit
लक्ष्य द्या:
मित्रांनो वरील लेखात आषाढी एकादशी वारी याचेबद्दल काही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तुमच्याकडे आषाढी एकादशी वारी बद्दल अजून काही माहिती असेल किंवा या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास तर कमेंट किंवा ई-मेल करून सांगावे. जेणेकरून यामध्ये अपडेट करता येईल. हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.